अतुल कुलकर्णी
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. उलट सोनिया गांधी आणि विशेषत: राहुल गांधी यांनी पटोले यांना वरदहस्त दिला असून त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात सरकार पडणार नाही याची काळजी पटोले यांनी घेतली पाहिजे, त्याचवेळी सगळ्यांना सोबत घेऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. उद्या ते काही नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे देखील मुंबईत होते. त्यांनी मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने आम्ही जे घडवले आहे ते बिघडवू नका, या शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देशभर महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी विविध राज्यात पत्रकार परिषदा घ्याव्यात असे ठरले. त्यानुसार खर्गे मुंबईत आले होते. पक्षाचे प्रभारी आणि ज्येष्ठ नेते मुंबईत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र मुंबईत नव्हते. लोणावळा येथे पटोले यांनी भाषण करताना आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. त्याचा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना दिले जातात, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. त्यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी आपली नाराजी योग्य शब्दांत दिल्लीपर्यंत पोहोचवली. त्यानंतर सूत्रे हलली. मात्र यावर पटोले म्हणाले, ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी जुन्या काळात कोणावर पाळत ठेवली गेली हे सांगत होतो. राज्य व देशाच्या प्रमुखांना अशी माहिती देण्याची पद्धत आहे हे मी सांगत होतो. मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडी टाकले गेले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालेल. मी सौदे करून राजकारण कधी केले नाही. भाजप हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. मात्र आमच्या आंदोलनामुळे घाबरलेल्या भाजपने हे जाणीवपूर्वक आरोप करणे सुरू केले आहे.’
येत्या काही काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या वतीने काही मंत्र्यांना बदलेले जाईल व काहींवर पक्ष कार्याची जबाबदारी दिली जाईल असे वृत्त आहे. नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासह मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल. मध्यंतरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या संबंधीचे एक पत्र पटोले यांनी माध्यमांना दिले. त्यावरून राऊत आणि पटोले यांना श्रेष्ठींकडून दिल्लीत वेगवेगळी विचारणा केली गेली. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत आलेल्या मल्लिकार्जुन खरगे आणि एच. के. पाटील यांना विचारले असता खरगे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या जबाबदारीने वागायला हवे, यापेक्षा मला जास्त बोलायचे नाही. तर पाटील म्हणाले, मी सर्व नेत्यांशी बोलणार आहे. त्यानंतर आपल्या प्रश्नांची उत्तरे देईन. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, तीन पक्षाचे सरकार चालवताना वादाचे मुद्दे होत असतात. मात्र आघाडी सरकार स्थिर आहे. दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. तशीच पाच वर्ष ही पूर्ण होतील. पुढे आम्ही एकत्र सत्तेत आलो तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. काँग्रेसने सुरू केलेले महागाईचे आंदोलन दाबून टाकण्यासाठी पटोले यांच्या विधानाचा वापर केला जात आहे, असा आरोपही थोरात यांनी यावेळी केला.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी दिल्लीहून पक्षाचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला. मी वेणुगोपाल बोलतोय, विधानसभा अध्यक्षपदाचे काय करायचे? असे फोनवरच विचारले तेव्हा काहीही न बोलता शरद पवार यांनी फोन ठेवून दिला. एवढ्या ज्येष्ठ नेत्यासोबत महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची ही कोणती पद्धत? असे म्हणत नंतर राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने हा सगळा प्रकार दिल्लीत सांगितला. त्यामुळे काही काळ अध्यक्षपद रेंगाळले. मात्र रविवारी बारामतीत शरद पवार यांनी विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, असे स्पष्ट केले. दरम्यान, ज्या पद्धतीने पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसलीही कल्पना न देता अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावरून मुख्यमंत्र्यांची नाराजी लपलेली नाही. म्हणून या निर्णयाला काहीसा विलंब झाल्याचे नेत्याने स्पष्ट केले.
कटुता येणारी विधाने टाळण्याचा सल्ला
- गेल्या काही दिवसांपासून पटोले सतत आघाडी सरकार अडचणीत येईल अशी विधाने करत आहेत. खान्देशच्या दौऱ्यात त्यांना दौरा अर्धवट सोडून दिल्लीत बोलावण्यात आले.
- दिल्लीच्या बैठकीत पटोले यांनी, मी कोणत्याही मंत्र्यांना पक्ष चालवण्यासाठी पैसे मागणार नाही. पक्षासाठी लागणारा निधी मी माझ्या पद्धतीने जमा करेन, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
- बाहेर कोणी काहीही बोलले तरी राहुल गांधी यांनी पटोले यांना अभय दिले आहे. फक्त कटुता येणारी विधाने टाळावीत असा सल्लाही राहुल गांधींनी दिल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
काही बंधने पाळावीत
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, मी पक्ष प्रभारी यांची वेळ मागितली आहे. उद्या आमची भेट होईल. तीन पक्षाचे
- सरकार चालवताना काही बंधने पाळावी लागतात, पक्षात सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत.
- कोणी, कुठे, कधी, काय बोलावे याविषयी मी भाष्य करण्याची गरज नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दोन ते तीन मंत्री बदलले जाणार
- एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात दोन ते तीन मंत्री बदलले जातील. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचे नाव निश्चित झाले आहे.
- त्यासाठी पक्षाचे प्रभारी पाटील, बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, हे तिघे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची लवकरच भेट घेतील व या बद्दलची विस्तृत चर्चा करतील.