मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. या महिन्यात 16 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी प्रतिलिटर महागले आहे. दरम्यान, पेट्रोल दरवाढीवरून आता राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे, तर राज्य सरकारने कर कमी केले तर पेट्रोल स्वस्त होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. याचत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. (State does not get money by selling companies like the center, Rohit Pawar criticized on BJP leader Chandrakant Patil)
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. "राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपाच्या एका नेत्याने केली. पण २०१४ च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी २०१४ च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज ३५०% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा ३२.९० रुपये तर राज्याचा २८.३५ रुपये कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रूपयाची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे”, असे ट्विट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज्यात सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "जागतिक स्तरावर इंधनाचे भाव वाढले की देशात पेट्रोलचे दर वाढतच राहतात. दर कमी करायचे असतील तर जागतिक स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र ते शक्य नाही. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केले तर पेट्रोलचे दर आटोक्यात येतील. तसेच, आघाडी सरकारनेदेखील शेजारच्या राज्यातील इंधन दराचा विचार करून आपल्या राज्यातील इंधनावरील कर कमी करावेत. जनतेला इंधन दरवाढीतून दिलासा द्यावा, असे टोला चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लगावला. नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रविवारी कोल्हापुरात भाजपाच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवर भाष्य केले.
आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या आजचा दरपेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा दणका दिला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी २९ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर १००.४७ रुपये झाला आहे. तर डिझेलसाठी ९२.४५ रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल ९४.२३ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.७६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.२५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८५.१५ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.९० रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८८ रुपये प्रती लीटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.३४ रुपये असून डिझेल ९३.६५ रुपये झाले आहे.