मुंबई – सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले की, कोर्टाच्या निकालावर पराभव किंवा विजय असं काहीही नाही. तसेच ना बिहार जिंकला ना महाराष्ट्र हरला आहे अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल परब म्हणाले की, कोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासाला चुकीचं म्हटलं नाही. या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देऊ की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ. महाराष्ट्र सरकारचं फक्त असं म्हणणं होतं की या खटल्याची चौकशी मुंबई पोलिसांना द्यावी आणि आवश्यक असल्यास हा खटला नंतर सीबीआयकडे पाठवावा. ही घटना मुंबईत घडली असल्याने मुंबई पोलिसांनी याची चौकशी करायला हवी होती असं त्यांनी सांगितले. (Sushant Singh Rajput Death)
तर विरोधक राजकीय फायद्यासाठी या विषयावर राजकारण करत आहेत. जर या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु ही केवळ आत्महत्येची घटना असल्यास ती दुर्दैवीच आहे असं म्हणत अनिल परब यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाला असं वाटतं की, त्यांच्याव्यतिरिक्त कोणीही महाराष्ट्रात सरकार चालवू शकत नाही. ते या प्रकरणातून ठाकरे कुटुंबाची बदनामी करत आहेत. विरोधक सुशांतबद्दल सहानुभूती दाखवत नाहीत. ते फक्त ठाकरे यांना दोष देत आहेत असा आरोप मंत्री अनिल परब यांनी विरोधकांवर केला.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची चौकशी सीबीआयकडे सोपविली असल्याचं स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं सुशांतच्या चाहत्यांनी आणि कुटुंबाने स्वागत केले आहे. दुसरीकडे, कोर्टाच्या या निर्णयानंतर मुंबईतील हालचाल वाढली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तात्काळ महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यापूर्वी परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. देशमुख दुपारपासूनच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सतत भेट घेत आहेत.
विरोधकांची सरकारवर टीका, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपानं निवडणूक प्रभारी केले आहे. सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारला घेरण्यासाठी भाजपानं ही रणनीती अवलंबली असल्याची चर्चा आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेन्शन करत सोमैय्या यांनी ही मागणी केली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण
शिवलिंग प्राप्तीसाठी बंद खोलीत दोन भावांची अघोरी प्रथा; एकाचा मृत्यू झाला अन् दुसरा...
आता नोकरीसाठी केवच एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा
मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा विषय नाही, तपास कमी पडला; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर
मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं करणं हे षडयंत्र; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले...