मुंबई : मेट्रो कारशेडबाबत सातत्याने निर्णय बदलत वाहतुकीच्या समस्यांनी बेजार झालेल्या मुंबईकरांच्या अडचणीत राज्य सरकारने वाढ केली आहे, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित असलेल्या आरे येथील मेट्रो कारशेडचा काम हे कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अंधेरीच्या मेट्रो रेल्वे स्टेशन समोर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. 800 एकर आरे जंगल वाचविण्याचा दावा जागोजागी होर्डिंग लावून सरकारद्वारे केला जात आहे. मात्र सरकारच्या या दाव्याची पोलखोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली आहे. या मोर्चाला संबोधित करताना प्रवीण दरेकर यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली.
हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, गोरेगावच्या आरे येथील कारशेड प्रकल्प बाबतच्या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या होत्या व त्यानंतर तो प्रकल्प तिथेच केला जाणार हे नक्की होतं. परंतु ठाकरे सरकारने अहंकाराच्या भावनेतून कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांसाठी सर्वाधिक प्राधान्याचा विषय वाहतूक आहे. मुंबईकरना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे ठाकरे सरकारला कधीच समजणे शक्य नाही कारण ते घरातच बसून असतात अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली.
मुंबईकरांच्या या वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिवस-रात्र एक करून या प्रकल्पावर काम केले होते. अरे येथे मेट्रो कार शेडचा निर्णय योग्य असताना देखील सध्याचे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो प्रकल्प आधी पहाडी आणि नंतर कांजूरमार्ग च्या कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या जागेवर स्थलांतरित केला. या जमिनीवर असलेली लिटिगेशन सोडवण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता जास्त आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.