रत्नागिरी - रा ज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी काेणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा सणणीत इशारा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बाेलताना दिला.
रत्नागिरीतील दि यश फाऊंडेशनच्या नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे भूमीपूजन नारायण राणे यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले. कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने माझी सुरक्षा काढली. मी त्यांच्या सुरक्षेचा विचार करत नाही. माझी सुरक्षा झेड प्लसवरून इथपर्यंत आली. पण मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. दहशतवादी लोकांकडून माझ्या जीविताला धोका असल्याने मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा पुरवली होती. सुरक्षा पक्ष नाही तर सरकार देत असल्याचे खासदार राणे यांनी सुनावले.मुख्यमंत्र्यांना सत्ता टिकविण्यात रस आहे, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची ताकद त्यांचेमध्ये नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. भंडारा येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून, याची चाैकशी व्हायला पाहिजे. या दुर्घटनेस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. या घटनेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांचे लक्ष असल्याचे सांगितले.