- यदु जोशीमुंबई : शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकार आणि भाजपची डोकेदुखी वाढत असतानाच शेतकरी हिताच्या मुद्यावरून काही वर्षांपूर्वी आमदारकीचा आणि नंतर खासदारकीचा राजीनामा देणारे आणि ओबीसी समाजाचे नाना पटोले यांना प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.जोखीम पत्करणे हा पटोले यांचा स्वभाव आहे. ते काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकार गंभीर नाही, असा आरोप करीत त्यांनी काँग्रेसची आमदारकी सोडली होती. २००९ मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून ते अपक्ष लढले आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले. प्रफुल्ल पटेल जिंकले होते. भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहिला.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदारकी ठोकरणारा नेता अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. कदाचित, काँग्रेसमध्ये आता आपल्याला फारशी संधी नाही, याचा अंदाज आल्याने की काय त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला असावा; परंतु राजीनाम्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जोड देण्याचे कौशल्य त्यांनी साधले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले व प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून जिंकले. पटोले भाजपमध्ये स्थिरावतील असे वाटत असतानाच, केंद्र सरकारची कृषीविषयक धोरणे आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि शेवटी ते भाजपमधून बाहेर पडले.नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात आव्हान दिले जाऊ शकते हे दाखवून देत त्यांनी काँग्रेसमध्ये जान आणली. विधानसभेचे अध्यक्ष असतानाही पटोले यांनी चौकटीबाहेर जाऊन भूमिका निभावली. एक आश्वासक ओबीसी चेहरा म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली असे दिसते. काही वर्षांपासून भाजपकडे झुकलेली व्होटबँक काँग्रेससोबत आणण्याचे मोठे आव्हान पटोले यांच्यासमोर असेल. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून ते किती यशस्वी होतात, या बाबत उत्सुकता असेल.
काँग्रेसला लाभला आक्रमक नेता, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर पक्षाला उभारी देण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 7:55 AM