कोलकाता : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपा २०० जागा जिंकेल असे विश्वास व्यक्त केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशीच जेपी नड्डांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मोठमोठे दगड, सिमेंटचे ब्रिक्स फेकून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे तणावाचे वातावरण आहे.
नड्डा यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे. आज ते ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. भाजपाने आरोप केला की, नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दक्षिण 24 परगनामध्ये टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा आरोप आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले. सुरक्षा दलाने नड्डांच्या कारला सुरक्षित बाहेर काढले.
या आधी भाजपाने दावा केला होता की, नड्डा यांच्या दौऱ्याच्या आधी काही तास भाजपाचे नगर अध्यक्ष सुरजित हल्दर यांच्यावर हल्ला झाला आहे. नड्डा यांच्या स्वागतासाठी भाजपाचे कार्यकर्ते झंडे, पोस्टर लावत होते. यावेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
भाजपाचे नगर अध्यक्ष सुरजीत हलधर यांनी सांगितले की, झेंडे लावत असताना १०० हून अधिक टीएमसी कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला केला. आम्हाला वाईट पद्धतीने मारहाण केली. मला ठार मारण्याची धमकीही दिली. यामध्ये आमचे १०-१२ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसने सांगितले की, हे आरोप खोटे आहेत. आम्ही कधीही असे काम करत नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच अभिषेक बॅनर्जी यांचे पोस्टर फाडले आहे. घोष आणि विजयवर्गीय नेहमी चुकीचे वक्तव्य करत असतात. भाजपा फक्त खोटे बोलते.
पश्चिम बंगाल भाजपमध्ये फेरबदल; विजयवर्गीय यांचे छाटले पंखपश्चिम बंगाल प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने अनेक संघटनात्मक बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदेश भाजपच्या सरचिटणीसपदी (संघटना) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक अमित चक्रवर्ती यांची नियुक्ती करून राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पंख छाटले, तसेच विजयवर्गीय यांना प. बंगालऐवजी मध्यप्रदेशात अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. या फेरबदलासोबत केंद्रीय नेतृत्वाने प. बंगाल प्रदेश भाजपची सूत्रे हाती घेतल्याचे संकेत दिसतात.