लखनौ : प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविल्यामुळे भाजपा व मित्रपक्ष आणि विरोधातील सपा-बसपा आघाडी यांना लोकसभा निवडणुकांत आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागतील असे राजकीय निरीक्षकांना वाटते. प्रियंका यांना सक्रिय राजकारणात उतरविण्याचा निर्णय खूपच उशीरा घेतला असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. प्रियंका यांचे व्यक्तिमत्व त्यांची आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळतेजुळते आहे.जनतेवर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पडणारा प्रभाव, लोकांशी संवाद साधण्याची शैली या गोष्टींचा काँग्रेसला फायदा होईल. इतर पक्षांनी जिंकण्यासाठी जातींच्या समीकरणाची केलेली जुळवाजुळव उधळून लावण्यात काँग्रेसला यश मिळेल असेही काही नेत्यांचे मत आहे.लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला वगळून उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपाने आघाडी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या ८० जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय गुलाम नबी आझाद यांनी जाहीर केला. पण प्रियंकांना राजकीय मैदानात उतरवून काँग्रेसने मोठा धक्का दिला. काँग्रेस खरोखर ८0 जागा लढवणार की ठराविक ३0 ते ५0 जागांवर उमेदवार देणार, हे स्पष्ट व्हायचे आहे. काँग्रेस जितकी क्षीण होईल तितके आपण प्रबळ होऊ हे प्रादेशिक पक्षांना नीट ठाऊक आहे. राज्यात २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसतर्फे केवळ सोनिया गांधी व राहुल गांधी हेच विजयी झाले होते.सपा-बसपाला मुस्लीम मतदार काँग्रेसकडे वळू नयेत म्हणून शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. ब्राह्मणांसहित इतर सवर्ण जाती तसेच दलितांची मते काँग्रेस वा भाजपाकडे न जाता, आपल्याकडेच राहातील याकडेही लक्ष द्यावे लागेल. सवर्णांतील आर्थिक दुर्बलांना भाजपाने १० टक्के आरक्षण दिले असले तरी तो समाज आपली पाठराखण करेलच याची भाजपाला खात्री वाटत नाही. त्यातच प्रियंकांच्या राजकारण प्रवेशामुळे भाजपा, सपा, बसपापुढे आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)
प्रियंकांच्या धसक्याने सपा-बसपा, भाजपाच्या रणनीतीत होतील बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 6:09 AM