चंदिगड - पंजाबमधी विधानसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. मात्र निवडणूक तोंडावर असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाबकाँग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. एकीकडे काँग्रेसकडून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद असाच सुरू राहिला तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो अशी चिंता काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र कॅप्टन अमरिंदर सिंग हे कुठल्याही परिस्थितीत सिद्धू यांना मंत्रिपदाखेरीज अधिक काही देण्यास इच्छुक नाही आहेत. दरम्यान, राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती पक्षनेतृत्वाला असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी सांगितले. जाखड म्हणाले की, दोन्ही नेत्यामधील वाद शमवून पक्षसंघटनेतील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षावर दबाव आणण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धूंकडून अशाप्रकारचे राजकारण खेळले जात आहे, असे पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थिती पक्षाने सिद्धूच्या म्हणण्याकडे फार लक्ष देता कामा नये. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रभाव अमृतसरपुरताच मर्यादित आहे. तसेच त्यांनी तिथे भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी अमृतसर येथून पराभूत केले होते.
दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा मोठा चेहरा सध्या नाही आहे. जर पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे दुर्लक्ष केले तर पक्षाला राज्यात विजय मिळवणे शक्य होणार नाही. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सध्यातरी पक्ष नेतृत्व कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर दबाव आणण्याच्या स्थिती नाही आहे. त्यामुळे काँग्रेस पुढील निवडणूक अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये सिद्धूंकडे फारसे पर्याय उपलब्ध नाही आहेत. शेतकरी आंदोलनामुळे राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही आहे. तर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये दुर्बळ होत चालला आहे. त्यामुळे पंजाबमधील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेस आणि अकाली दल यांच्यातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कितीही नाराज असले तरी सिद्धू हे काँग्रेससोबतच राहतील, असा काँग्रेस नेतृत्वाचा अंदाज आहे.