बीड : भगवान गडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ऊस तोडणी कामगारांच्या मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये त्यांनी उसतोडणी कामगारांना कारखानदारांना गरज असल्याचे सांगितले. भगवान गड हे क्रांतीचे प्रतिक मानले जाते, ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे, लक्षात घ्या, त्यामुळे आणखी 10 दिवस नाक दाबलेय ते तसेच ठेवा, असे आवाहन केले.
ऊसतोड कामगारांची मोठी अडचण होतेय. तुम्हाला शेतात काम नाही मिळाले तर रोजगार हमी योजना आहे. एकदा का अर्ज केला की तीन दिवसांत सरकारला रोजगार द्यावाच लागतो. नाहीतर रोजगार भत्ता द्यावा लागतो. यामुळे गरज साखर कारखानदारांना आहे. तुम्हाला नाही, असे त्यांनी ऊसतोड कामगारांना सांगितले. तसेच सातारा, सांगली भागात उसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. तेथील लोकच कंटाळले आहेत. आपल्यापैकी काही कामगारांना कारखानदारांनी जबरदस्तीने उचलून नेले आहे. त्यांचे काही व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांची अवस्था पाहिली असलाच. त्यांना रहायलाही जागा नाहीय. यामुळे आणखी काही दिवस थांबा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
मशीन सहा इंच वरून ऊस कापते आणि जर खोडापासून कापला गेला तर साखर अधिक मळली जाते. यामुळे कारखान्यांनी किती जरी मशीन आणायचा प्रयत्न केला तर तो असफल होणार आहे. यामुळे कारखानदार कामगारांना कधीच सोडणार नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले. जर तुम्हाला उचलून नेत असतील तर वाटेत दिसणाऱ्या पोलिसाला हाक मारा, हात दाखवा आणि त्यांना सांगा हे जबरदस्तीने नेत आहेत, असा सल्लाही त्यांनी दिला.