मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी तासभर बंदद्वार चर्चा केली. सुजय यांनी अहमदनगरमधून भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा या भेटीत व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सायंकाळी सुजय विखे हे महाजन यांच्या मलबार हिलवरील शासकीय बंगल्यावर पोहोचले. तेव्हा महाजन हे सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. थोेड्यावेळाने ते परतले आणि त्यांनी विखे यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. राष्ट्रवादीने आधी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शविली पण नंतर त्यांनी यूटर्न घेतला. सुजय यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी दर्शविल्यानंतरही तो प्रस्ताव न स्वीकारता अन्य नावावर राष्ट्रवादी विचार करीत असल्याचे समजल्यानंतर सुजय यांनी भाजपाशी संपर्क साधला आणि त्याचाच एक भाग म्हणून महाजन यांच्याशी आज चर्चा केली असे मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय यांना महाजन यांच्याशी बोलून घ्या, असा निरोप दिला होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गिरीश महाजन यांना या भेटीबद्दल विचारले असता त्यांनी हसत हसत मेडिकल कॉलेजची चर्चा झाल्याचे सांगितले.
सुजय विखे आता भाजपाच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 4:57 AM