पुणे : महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे राजकारण हे घराण्यांवर आधारीत असल्याचे म्हटले जाते. महाराष्ट्रात तर राजकीय घराण्यांचे नातेसंबंधही असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. काहीवेळा वेगवेगळ्या पक्षांमुळे किंवा निवडणुकांमुळे नातेवाईकच एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले दिसतात. असंच एक नातं म्हणजे बारामती मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यामध्ये. कांचन या सुनेत्रा यांच्या चुलत भावाच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर तात्काळ त्यांना फोन करून अभिनंदन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुल यांचे लग्न सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने झाले आहे. राहुल कुल रासपमध्ये असले तरी कांचन यांचे वडील कुमाराजे निंबाळकर हे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत होते. आता ते आपल्या मुलीचा प्रचार करत आहेत. अगदी सुरुवातीला उमेदवारी जाहीर झाल्यावर काहीशा गोंधळलेल्या कुल आता जोरात प्रचार करत आहेत.
ज्यावेळी कांचन यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्यांचे पती राहुल कुल यांनी त्यांना मोबाईल बंद करून ठेवण्यास सांगितले. पुढील रणनीती ठरवली नसल्याने त्यांनी कांचन यांना मी येईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशाही सूचना दिल्या होत्या. दरम्यान सुनेत्रा पवार या कांचन यांना फोन करून अभिनंदन करण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेर फोन न लागल्याने त्यांनी राहुल यांना फोन केला. त्यानंतर कांचन यांनी सुनेत्रा यांना फोन केल्यावर त्यांनी अभिनंदन तर केलेच शिवाय शुभेच्छाही दिल्या. कांचन यांनी असे विरोधात लढायचे म्हटल्यावर त्यांनी ,'राजकारणात हे सर्व होत असते,''नाते नात्याच्या जागी आणि राजकारण राजकारणाच्या' हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.