- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांना पंजाबमधून भाजपतर्फे लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल यांची राष्ट्रवादी व देशभक्ताची प्रतिमा पाहून भाजप त्यांना पंजाबमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो. तथापि, त्यांच्याकडून निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही; परंतु भाजप अध्यक्ष अमित शहा व सनी यांची नव्याने झालेली भेट पाहता या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही, असे दिसते.सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपशी जोडले गेलेले आहेत. २००४ मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत:ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत आहेत, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम त्यांचे पुत्र सनी देओलवरही होण्याची शक्यता आहे.जाबमधील एका भाजप नेत्याने सांगितले की, सनी देओल यांनी पंजाबमधून निवडणूक लढवल्यास भाजप मजबूत होईल. सनी देओल यांच्या देशभक्ताच्या प्रतिमेमुळे निवडणूक जिंकण्यास त्यांना चांगलीच मदत होणार आहे. 2017 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात अकाली दलासह लढणाऱ्या भाजपाला पराभव पत्करावा लागला होता.
सनी देओल पंजाबमधून भाजपाच्या तिकीटावर लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 3:53 AM