मुंबई – राज्यातील राजकारणात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे कट्टर विरोधी पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी सत्ता महाविकास आघाडी सरकारची आहे. यात अलीकडेच राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील असा विश्वास व्यक्त केला. परंतु या विश्वासाला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून छेद दिला जात आहे.
आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगत आहेत. राज्यभरात ते विविध दौरे भेटीगाठी करत पक्षीय संघटनेचा आढावा घेत आहे. त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य करताना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी आहे. मित्रपक्षांचे काय प्लॅनिंग आहे आम्हाला माहिती नाही. आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही असं म्हटलं आहे. त्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही याचा पुनरुच्चार केला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असून आपले या भूमिकाला समर्थन असल्याचे माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव प्राप्त करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे असंही नसीन खान यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार बनवणार
भाजप हा कायम आमचा विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपाविरोधात मोट बांधत असतील, तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवले जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.