"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:48 PM2024-10-07T17:48:34+5:302024-10-07T17:53:04+5:30
Supriya Sule Latest News: इंदापुरातील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी घड्याळ चिन्ह गेल्यानंतरची गोष्ट सांगितली.
Supriya Sule News: "अमोल कोल्हे आणि माझी कथा तर काय काय आहे. आम्ही दोघांनी जेव्हा लढायचं ठरवलं, तेव्हा आमच्याकडे ना पक्ष होता, ना चिन्ह. अमोल दादा मला म्हणायचे कोणत्या चिन्हावर लढायचं? मी त्यांना म्हणायचे की काय चिन्ह असेल? ते म्हणाले, नाही मिळालं चिन्ह तर वेगळ्या चिन्हावर लढायला लागेल. मग मी म्हणाले, तुम्ही काय घेणार? अमोल दादा म्हणायचे, 'मला असं वाटतं तुम्ही कपबशी घ्या. मग त्यांना म्हटलं तुम्ही काय घेणार? अमोल दादा म्हणायचे मला असं वाटतं की, 'मी पंखा घेऊन की कपाट घेऊ की काय घेऊ, असे आम्ही सुनावणीच्या काळात बोलत बसायचो", असा अनुभव सांगत सुप्रिया सुळे यांनी घड्याळ चिन्हाचा उल्लेख न करता भाष्य केले.
इंदापुरात बोलताना त्या म्हणाल्या, "मला आजही ते दिवस आठवतात. आम्ही तासन् तास, आम्ही कोर्टात, निवडणूक आयोगात जायचो, चार-चार तास सुनावणी व्हायची. पवार साहेब एक शब्द बोलायचे नाही. आम्ही सुनावणीला जायचो, नंतर निकाल काय लागला? हे तुमच्या सगळ्यांच्यासमोर आहे."
त्या गोष्टी पांडुरंगाने काढल्या -सुप्रिया सुळे
"माझं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे. म्हणून मी पांडुरंगाला रोज प्रार्थना करायचे की, असं माझं काय चुकलं की तू माझं सगळं काढून घेतलं रे बाबा! नंतर माझ्या लक्षात आलं की, ज्या गोष्टी माझ्या गरजेच्या नाहीत, त्या माझ्या पांडुरंगाने काढल्या", असे सुप्रिया सुळे इंदापुरात म्हणाल्या.
"आता तुम्ही विचार कराल की काय काढून घेतलं? तर तुम्ही वेळ कशात बघता, हातात (घड्याळ) बघता की, मोबाईलमध्ये बघता? (उपस्थित म्हणाले, मोबाईलमध्ये) मग लागतं (घड्याळ) का? खर्च कमी आहे. एका मोबाईलमधूनच सगळं कळतंय. त्यामुळे जी गोष्ट लागणारच नाही, सुप्रिया तुला ती (घड्याळ) नको म्हणून माझ्या पांडुरंगाने काढून घेतली", असे सुप्रिया सुळे उपस्थितांना म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पांडुरंगाने तुतारी वाजवणारा माणूस दिला"
"काय माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात टाकलं बघा. तर तुतारी वाजवणारा माणूस माझ्या पदरात टाकला. काय आहे तुतारी वाजवणारा माणूस? जेव्हा लग्न कार्य होतं, तेव्हा तुतारी वाजते. नवीन काही सुरू होतं, तेव्हाही तुतारीच वाजते", असे म्हणत त्यांनी घड्याळ चिन्ह गेल्यानंतरचा अनुभव सांगितला.