Supriya Sule News : 'ही निवडणूक मी फकिरासारखी लढले. सगळे काही माझ्याविरोधात होते', असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीबद्दल केले. गेल्या काही दिवसांत अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे, याबद्दलही सुप्रिया सुळेंनी भाष्य केले.
सीएनएन-न्यूज18 वृत्तवाहिनीच्या टाऊनहॉल कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक, अजित पवारांकडून शरद पवारांबद्दल हल्ली केली जाणारी विधाने यावर भूमिका मांडली.
जिंकेल याचा विश्वास नव्हता -सुप्रिया सुळे
लोकसभा निवडणुकीबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आमचे चिन्ह घेऊन टाकले, आमचे नाव घेऊन टाकले. सगळं काही माझ्याविरोधात होते. मी ही निवडणूक सर्व आव्हानांविरोधात लढले. मी फकिरासारखे लढले."
"मी निवडणूक जिंकेल, याबद्दल मला शंभर टक्के खात्री नव्हती. अनेक आव्हानांचा सामना करत मी निवडणूक लढत होते", असे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले.
अजित पवार-शरद पवार एकत्र येणार? सुळे म्हणाल्या...
'घरात फूट पाडू नका, मी चूक केली', असे विधान अजित पवारांनी केले होते. त्याच्या या विधानाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही त्यांना विचारायला हवे. मी काय करणार, याबद्दल मी सांगू शकते. जर तर च्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकत नाही. जे परत आले आहेत, त्यांनी असे करण्याचे कारण म्हणजे त्यांचा शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे."
मविआचा मुख्यमंत्री कोण?
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा मुद्दा समोर आला होता. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आमची आघाडी खूप समजंस्य आहे. आम्ही हा निर्णय भविष्यात घेऊ. लोकशाहीमध्ये आघाडीतील घटक पक्षांनी बोलले पाहिजे. उद्धव ठाकरे जे बोलले त्याचं मी स्वागत करते", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.