राज्यातील शिवसेनाप्रणित उद्धव ठाकरे यांचे महाआघाडी सरकार गेल्या काही महिन्यांपासून नाजूक प्रकरणांनी घायाळ झाले आहे. यावर भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार आणि मनसे इंजिनासोबतच्या कथित युतीच्या दिशेने वाक्बाण सोडला आहे. (Bjp mumbai Precident Ashish Shelar talks on Municiple Election, MNS, Shivsena.)
लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात आहे पण त्यांचे मंत्री अडथळे आणतायत का? असं विचारलं असता शेलार यांनी यामुळे सरकारची दिशा चुकतेय असे म्हटले. त्यानंतर जाता जाता दिशा या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीनं घ्या, असं मिश्किलपणे म्हणाले. दिशा सालियान आत्महत्येवरून शेलारांनी उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बाण सोडला आहे.
मनसे भाजपा युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप फक्त मुंबईकरांच्या जवळ, इंजिनाच्या जवळ नाही. आम्ही मनसेच्या जवळ गेलो नाही आणि तेही आमच्या जवळ आले नाहीत, मुंबईकरांच्या मनात फक्त कमळ, इंजिन, हात, घड्याळ, धनुष्यबाण वगैरे काही नाही, असे शेलार म्हणाले.
संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.