मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवावं असा निर्णय बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला. सुशांतचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहावा अशी आग्रही मागणी सत्ताधारी शिवसेनेची होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निकालानं हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी जाणार हे आता स्पष्ट झालं आहे.
मात्र या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. याला कारण म्हणजे सुशांतच्या सीबीआय चौकशीवरुन २ घटना प्रखरतेने लक्षात आल्या. त्याम्हणजे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यूची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी केली.
पार्थ पवार इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन निवेदनही सादर केलं. पार्थ पवार याच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन आजोबा शरद पवार यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे अशा शब्दात शरद पवारांनी फटकारलं होतं. शरद पवारांच्या अशा भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारही नाराज असल्याचं सांगितले जात होते. तो लहान आहे, हळूहळू कळेल, पण जाहिररित्या असं त्याला बोलणं योग्य नव्हे असं मत अजित पवारांचे होते.
शरद पवारांनी पार्थबाबत केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा पवार कुटुंबातील मतभेदावर चर्चा सुरु झाली. पार्थ पवारांनी कुटुंबातील नातेवाईकांच्या भेटीगाठी सुरु केल्या. पार्थ लवकरच मोठा निर्णय घेईल असंही सांगितलं जात होतं. पार्थ पवार यांनी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांसोबतही पार्थ पवारांची भेट झाली होती. पार्थ प्रकरणात सर्वकाही आलबेल आहे अस चित्र उभं केलं गेले. त्यानंतर या वादावर पडदा पडणार असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ यांनी केलेलं सत्यमेव जयते या ट्विटचे अनेक अर्थ काढण्यासारखे आहेत. एकीकडे राज्य सरकार या निर्णयावर सल्लामसलत करत असताना खुद्द शरद पवार यांच्या नातूने अशाप्रकारे ट्विट केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. कारण जाहिररित्या आजोबांनी फटकारल्यानंतरही पार्थ यांनी त्यांची भूमिका योग्य असल्याचं ट्विटमधून मांडली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
कोण आहेत श्रीनिवास पवार?
श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे बंधू आहेत. यापूर्वी अजितदादांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा शपथविधी उरकल्यानंतर अजित पवार हे बंधू श्रीनिवास पवार यांच्या चर्चगेट येथील निवासस्थानी मुक्कामी होते. शरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थने श्रीनिवास पवार यांचीही भेट घेतली. एकेकाळी श्रीनिवास पवार यांच्यावर मुंबई सकाळची जबाबदारी होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण
शिवलिंग प्राप्तीसाठी बंद खोलीत दोन भावांची अघोरी प्रथा; एकाचा मृत्यू झाला अन् दुसरा...
आता नोकरीसाठी केवच एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा
मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा विषय नाही, तपास कमी पडला; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर
मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं करणं हे षडयंत्र; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले...