मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका करत तुम्ही गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार बनावट अकाऊंट उघडण्याचा प्रकार समोर आल्यावर त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष निशाणा बनवलं.
यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाऊंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा असा घणाघात केला आहे. याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणे भाजपावर राजकीय खोटे आरोप केले, अनिल देशमुखांच्या आरोपाचा आम्ही तीव्र निषेध करतो, तुम्हाला जी चौकशी करायची ते खुशाल करा, भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही बेकायदेशीर काम केलं नाही, करत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच हेच अनिल देशमुख यांनी पूर्वी सांगितलं होतं, भाजपा सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग केले त्याची चौकशी करू, या चौकशीचं काय झालं? हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, महाराष्ट्राची बदनामी दुसरं कोणी करत नसून राज्यातील महाविकास आघाडीच करतेय, राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचाराकडे लक्ष द्यावं, पुण्यात गोळीबार झाला त्याकडे लक्ष द्यावं, महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय गृहमंत्री इतके बेजबाबदार कधीही पाहिले नाही अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केली.
काय म्हणाले होते अनिल देशमुख?
बिहार निवडणुकीमुळे भाजपाने सुशांत प्रकरणावर राजकारण केले. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. एम्सच्या अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. यावरून हे सिद्ध होते की मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्य होता. सुशांत प्रकरणात आता सत्य समोर आले आहे. सुशांतच्या नावाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. याशिवाय मुंबई पोलिसांचीही बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासणी अहवालाबद्दल खोटी अफवा पसरवली, यामागे कोण होता हे सर्वांनाच ठाऊक आहे. खोटे बोलण्यामागे भाजपाचा हात आहे. या विषयावर भाजपाने थोडे राजकारण केले. बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून हा मुद्दा फक्त भाजपानेच लावला होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे आहे की, ते महाराष्ट्रात मतभेद आणणार्या गुप्तेश्वर पांडे (बिहारचे माजी डीजीपी) यांच्यासाठी प्रचार करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.