मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. यासोबतच न्यायालयानं मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम असून सीबीआय तपासाची आवश्यकता नसल्याची भूमिका वारंवार गृहमंत्री अनिल देशमुख आणि सरकारकडून मांडली जात होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्य सरकारसाठी धक्का मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करून निशाणा साधला आहे. 'अब बेबी पेंग्विन तो गयो!!! इट्स शो टाईम!' असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत हा हॅशटॅगदेखील वापरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. सत्यमेव जयते, असं ट्विट पार्थ यांनी केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशा मागणीचं पत्र पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. देशमुख राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे पार्थ यांना आपल्याच मंत्र्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं. भविष्यात सर्वोच्च न्यायालयानं सुशांतशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घ्यावा, अशी सूचना न्यायालयानं केली. 'सीबीआय केवळ पाटण्यातील एफआयआरचा तपास करण्यासच सक्षम नाही, तर या प्रकरणाशी संबंधित आणखी गुन्हे दाखल झाल्यास त्यांचा तपासदेखील सीबीआय करेल,' असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.