मुंबई – सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यावरुन राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. कोर्टाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही, कायदेशीर बाब आहे, हे प्रकरण न्यायालयाच्या अख्यारित आहे. कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महाधिवक्ता बोलू शकतात अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, न्याय आणि संघर्ष करणारं राज्य आहे. राज्याने कधी कोणावर अन्याय केला नाही. संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांची बदनामी आपल्याच राज्यातील नेते करत असतील तर ते राज्याचं खच्चीकरण आहे असं त्यांनी सांगितले.(Sushant Singh Rajput Death)
तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही. विरोधक या निर्णयानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत त्यावर ते बोलण्यास सक्षम आहेत. मुंबई पोलिसांच्या(Mumbai Police) प्रामाणिकावर शंका घेणे म्हणजे ज्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, आणि ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. जर हे सगळं ठरवून होत असेल तर त्याला राज्य सरकार काय करणार असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
सरकारला आत्मचिंतन करण्याची गरज - फडणवीस
सुप्रीम कोर्टाच्या(Supreme Court) निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपानं निवडणूक प्रभारी केले आहे. सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारला घेरण्यासाठी भाजपानं ही रणनीती अवलंबली असल्याची चर्चा आहे.
गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय(CBI) तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेन्शन करत सोमैय्या यांनी ही मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर हे प्रकरण चांगले गाजत आहे. विरोधकांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती तर मुंबई पोलीस आणि राज्य सरकारने सीबीआयकडे तपास सोपवण्यास विरोध केला होता. या प्रकरणी नाव आल्यानंतर स्वत: आदित्य ठाकरेंनी पत्रक काढत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू तितकाच धक्कादयक आहे, मुंबई पोलीस खोलवर तपास करत आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू म्हणून सांगतो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.