मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. या प्रकरणावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळतं. सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. मात्र आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.
सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे देता मग न्यायाधीश लोया आणि भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार आहे. सीबीआय चौकशी कधीही करता येते असं नाही, राज्य सरकारने याबाबत केंद्राकडे शिफारस करावी लागते. सीबीआय चौकशी लावण्याचीही काही प्रक्रिया आहे. लोकशाहीचे नियम डावलून कुणीही चौकशी करु शकत नाही, त्यामुळे सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि न्या. लोया (Justice Loya) प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या असं अरविंद सावंत यांनी एबीपी माझाच्या चर्चेत वक्तव्य केले आहे.
तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा बिहार पोलिसांचा काय संबंध आहे? मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. बिहार सरकारच्या सांगण्यावरुन सीबीआयकडे तपास सोपवावा हे गरजेचे नाही. या प्रकारामुळे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. काही लोक सुशांत प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणीही उठावं आणि सीबीआय चौकशी लावावी असं झालं तर याला काही अर्थ नाही. देशाच्या संविधानालाच धक्का देणार का? अशी टीका शिवसेना(Shivsena) खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर केली आहे.
काय आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरण?
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं, या प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. सुरुवातीला या प्रकरणाला बॉलिवूडमधील घराणेशाही कारणीभूत असल्याचं बोललं जात होतं, त्यामुळे चाहत्यांनी करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधातही सोशल मीडियात रान उठवलं होतं, त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पटना येथे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केली, सुशांतच्या बँक खात्यातून रिया यांनी पैसे काढल्याचा आरोप झाला. त्यानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर ईडीनेही गुन्हा दाखल केला. यातच विरोधकांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे अशाप्रकारे विधान करुन महाराष्ट्रातील युवा मंत्र्याकडे बोट दाखवलं. बॉलिवूडच्या काही मंडळीची ८ आणि १३ जूनला पार्टी झाली होती. त्यात युवा मंत्री सहभागी होते असा आरोप करत अप्रत्यक्षपण आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं. त्यानंतर आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी स्वत: या प्रकरणी पत्रक काढत माझा या घटनेशी काहीही संबंध नाही असा खुलासा केली. त्यानंतर प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी जोर धरु लागली. बिहार सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टाकडेही अर्ज केला. अलीकडेच सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने सीबीआय(CBI) चौकशीस विरोध केला आहे. त्यामुळे सुशांत सिंग प्रकरणाचा तपास कोणी करायचा हा मुद्दा आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.