नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर राष्ट्रीय मालमत्ता विकल्याचा आरोप करत निशाणा साधलाय. 'देशात कोविडची परिस्थिती "चिंताजनक" होत असताना आणि लसीकरणाची गती मंद असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रीय विमुद्रीकरण पाइपलाइनची घोषणा करण्यात व्यस्त आहेत,'असा आरोप राहुल गांधींनी केला.
त्यांनी ट्विट केलं, "कोविडची वाढती संख्या चिंताजनक आहे. पुढच्या लाटेत गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. पण, भारत सरकार विक्रीत व्यस्त असल्यानं कृपया आपली काळजी घ्या."
गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या प्रकरणांमध्ये सुमारे 23 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 46,164 नवीन प्रकरणं नोंदली गेली असून, 607 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, भारतात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अजूनही 3,33,725 आहे.
राहुल गांधींनी सरकारवर कोरोना परिस्थितीवरुन अनेकदा टीका केली आहे. यात लसीच्या अभावामुळे राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत अडचण, लसीच्या किंमती, कोविड -19 चा अर्थव्यवस्थेवर परिणाम, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग, अशा अनेक मुद्यांवरुन राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला आहे. कालही राहुल गांधींनी ट्विट केलं होतं, 'आधी इमान विकला आणि आता ...#IndiaOnSale'