लोकसभा निवडणूक 2019: 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:34 PM2019-05-24T16:34:01+5:302019-05-24T16:41:25+5:30
भाजपा आमदाराचा काँग्रेसला टोला
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपानं घवघवीत यश मिळवत केंद्रातील सत्ता कायम राखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या नेतृत्त्वाखाली पक्षानं गेल्या निवडणुकीपेक्षा भव्यदिव्य यश मिळवलं. या विजयानंतर भाजपाचे गुजरातमधील आमदार हर्ष संघवींनी केलेलं ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
भाजपाच्या दणदणीत यशामुळे अनेक राज्यं काँग्रेसमुक्त झाली. तर काही राज्यांमध्ये काँग्रेस फक्त नावाला शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर सूरतमधील मजुरा मतदारसंघाचे भाजपा आमदार हर्ष संघवी यांनी एक ट्विट केलं. 'तुम्ही चर्चगेटवरुन ट्रेन पकडली आणि उत्तरेच्या दिशेनं प्रवास करू लागलात, तर काँग्रेसचा पहिला खासदार तुम्हाला थेट पंजाबमध्ये सापडेल,' अशा शब्दांनी संघवींनी काँग्रेसला टोला लगावला. भाजपाच्या शानदार विजयानंतर त्यांनी हे ट्विट केलं.
If you catch a train at Churchgate station and travel towards North... The first Congress MP you will find is in Punjab.
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) May 23, 2019
चर्चगेट स्थानक दक्षिण मुंबई मतदारसंघात येतं. या ठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांचा पराभव केला. याशिवाय शिवसेना, भाजपानं मुंबईतील सर्वच्या सर्व 6 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. मुंबई सोडून उत्तरेकडे जाऊ लागल्यास मध्ये गुजरात, राजस्थान, हरयाणा ही राज्यं येतात. या सर्वच राज्यांमध्ये भाजपानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या ठिकाणच्या सर्व जागा भाजपानं जिंकल्या. पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला चांगलं यश मिळालं. राज्यातील 13 पैकी 8 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. याच संदर्भानं संघवींनी ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांच्या ट्विटला सोशल मीडियानं जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.