मुंबई – देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात तामिळनाडूमध्ये १० वर्षानंतर डीएमके सत्तेत परतली आहे. डीएमके(DMK) चे प्रमुख एम के. स्टॅलिन यांच्या विजयाबद्दल अनेक स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. एम के स्टॅलिन हे तामिळनाडूचे ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेले करूणानिधी यांचे चिरंजीव आहेत. सध्या डीएमके पक्षाच्या अध्यक्षपदाची ते जबाबदारी सांभाळत आहेत.
तामिळनाडूत मिळालेल्या यशाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटरवरून स्टॅलिन यांचे अभिनंदन केले होते. त्याला स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. राज ठाकरे म्हणाले होते की,'तुमचे वडील करुणानिधी हे प्रांतिक आणि भाषिक अस्मितेच्या राजकारणाचे प्रतीक होते, हीच परंपरा पुढे तुम्ही देखील कायम ठेवाल अशी आशा मी व्यक्त करतो अशा शब्दात त्यांनी एम के स्टॅलिन यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
राज ठाकरेंच्या या ट्विटवर रिप्लाय देऊन स्टॅलिन यांनीही मनसे अध्यक्षांचे आभार मानलेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर लवकरच आरूढ होणारे एम के स्टॅलिन यांनी राज ठाकरे ह्यांचे ट्विटरवर आभार मानत म्हणाले की, ' हो आपण म्हणल्याप्रमाणे भाषिक, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांची स्वायत्तता हाच माझ्या पुढील राजकारणाचा पाया असेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
तामिळनाडूत नवीन समीकरण
गेल्या अनेक निवडणुकीत राज्याच्या राजकारणात दबदबा असणारे एम करुणानिधी आणि जयललिता यांच्या अनुपस्थितीत ही राज्यातील पहिलीच विधानसभा निवडणूक होती. अण्णा द्रमुक यांना जयललिता यांच्याऐवजी कोणताही पर्याय शोधता आला नाही. तर द्रमुकने करुणानिधी यांचे सुपूत्र एम के स्टॅलिन यांच्यावर भरवसा ठेवला. जर अण्णा द्रमुक सत्तेत कायम राहिली असती तर डीएमकेमध्ये फूट पडली असती. परंतु डीएमकेच्या यशामुळे स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्याशिवाय राज्यात तिसरी राजकीय शक्ती उभी राहण्याची संधी मिळाली आहे. जो प्रयत्न भाजपा गेल्या अनेक वर्षापासून करत होती.
२०१६ च्या निवडणुकीत असा होता तामिळनाडूचा निकाल
२३४ जागा असलेल्या तामिळनाडू विधानसभेच्या २०१६ निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वात अण्णाद्रमुकने १३६ जागांवर यश मिळवलं होतं. तर करुणानिधी यांच्या नेतृत्वात द्रमुकच्या खात्यात ९८ जागा पडल्या होत्या. जयललिता सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाली. पण ५ डिसेंबर २०१६ मध्ये जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. परंतु जास्त काळ त्यांना मुख्यमंत्री राहता आलं नाही. त्यानंतर पलानीस्वामी हे मुख्यमंत्री बनले तर पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्री बनले होते.