- असिफ कुरणे चेन्नई : तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांत दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची संधी २०१६ मध्ये अण्णा द्रमुकला मिळाली होती. दर पाच वर्षांनी सत्तेची सूत्रे बदलणाऱ्या तमिळी जनतेचा २०१६ मध्ये पण तसाच मूड होता. पण, निवडणूक मैदानात उतरलेल्या काही नव्या पक्ष आणि आघाड्यांमुळे अटी-तटीच्या लढती होत २५ जागांचा निकाल अवघ्या काहीशे मतात लागला. त्यातील १७ जागा अण्णा द्रमुकने पटकावल्या आणि जे. जयललिता यांना मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली होती.२०१६च्या निवडणुकीतीत सत्ताधारी अण्णाद्रमूक आघाडी विरुद्ध द्रमुक आघाडी असाच प्रमुख सामना होता, पण त्यावेळी इतर दोन आघाड्या आणि काही प्रादेशिक पक्षांनी सत्तेची गणिते बिघडवली होती. अण्णा द्रमुक आघाडीला १३६ जागांवर समाधान मानावे लागले. २०११ च्या तुलनेत त्यांच्या १४ जागा कमी झाल्या होत्या. द्रमुक आघाडीने जोरदार पुनरागमन करत ९८ जागांपर्यंत मजल मारली. पण सत्तेत पोहोचण्यासाठी २० जागा कमी पडल्या.अण्णा द्रमुक तब्बल १७ जागा या एक हजारांपेक्षा कमी मताधिक्याने जिंकल्या होत्या. इतर आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे अण्णा द्रमुकला सत्तेत पोहोचण्यासाठी मदत झाली होती. द्रमूकला देखील कमी मताधिक्याने पाच जागा मिळाल्या होत्या. राधापूरम मतदारसंघातून अण्णा द्रमुकच्या आय. इन्बादुराई यांनी अवघ्या ४९ मतांनी विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे कथ्थूमन्नारकोई मतदारसंघातून एन. मरुगूमारन यांनी ८७ मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. व्हीसीकेचे थिरूमलवूलन हे दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानांवर राहिले होते.कमी मतांनी निकाल लागलेले मतदारसंघ (कंसात मताधिक्य) अण्णा द्रमुकने जिंकलेले मतदारसंघ१. पून्नामल्ली (७६३), २. अवडी (१०५) ३. पेराम्बूरू (१२४), ४. रोयापूरम (१०३१) ५. थिरूपिरूर (९५०) ६. वारगूर (९८२) ७. अंथीयूर (१०७) ८. करूर (४४१) ९. चिदंबरम (२६५), १०. कथ्थूमन्नारकोई (८७), ११ नन्नीलम (५७६), १२. पेरावूरानी (९९५) , १३. विरालीमलाय (९८६), १४. औट्टापिडारम (४९३), १५. कोविलपट्टी (४२८), १६. तेनकासी (४६२), १७ राधापुरम (४९) द्रमुकने जिंकलेले मतदारसंघ१. चेयूर (३०४) २. तिंडीवनम (१०१) ३. परामरीचेलूर (८१८) ४. थिरुमयम (७६६)५. थिरुनेलवेल्ली (६०१)
त्या २५ जागांनी बदलले होते सत्तेचे गणित, अण्णा द्रमुकला मिळाली दुसऱ्यांदा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:08 AM