कांचीपूरम : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत एका जागेवर जरी अखिल भारतीय अण्णा द्रमुकचा उमेदवार विजयी झाला तर तो ‘भाजपचा आमदार’ असेल. त्यामुळे मतदारांनी माझा आणि माझ्या पक्षासोबत असलेल्या मित्रपक्षांना मत द्यावे, असे आवाहन द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी रविवारी केले. ते येथील उथिरामेरूर येथे प्रचारसभेत बोलत होते.
स्टालिन म्हणाले, ‘राज्यात २३४ जागांच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखालील आघाडी २०० जागा जिंकणार हे मी सांगत आलो आहे. तथापि, मी राज्यात सतत सुरू ठेवलेल्या प्रचार मोहिमेत जनतेकडून जी माहिती मिळते आहे, त्यावरून मी म्हणतो की, आम्हीच सर्व २३४ जागा जिंकणार आहोत. अ. भा. अ. द्रमुकने एक जागा जरी जिंकली तरी तो आमदार हा अ. भा. अ. द्रमुकचा नव्हे तर भाजपचा असेल.’
अ. भा. अ. द्रमुकचे लोकसभेत एकमेव सदस्य आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे चिरंजीव पी. रवींद्रनाथ हे ‘भाजपचे खासदार’ म्हणून काम करत असून, त्यांनीच हे सिद्ध केले आहे, असा दावा स्टालिन यांनी केला. या पार्श्वभूमीवर आम्ही भाजपला जिंकू देऊ नये आणि त्याचमुळे अ. भा. अ. द्रमुकलाही सत्तेवर येऊ देऊ नये, ही बाब मतदारांनी लक्षात ठेवली पाहिजे, असे स्टालिन म्हणाले.
ही तर भाजपची शाखा...
मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा स्टालिन यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, अ. भा. अ. द्रमुक हा भाजपची शाखा आहे. पलानीस्वामी यांनी स्टालिन यांचे आरोप खोटे आणि आक्षेपार्ह असल्याचे वारंवार म्हटले आहे.