तिरुअनंतपुरम : भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांचे आणि सहयोगी पक्ष एआयएडीएमके उमेदवाराचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केले. भाजप आघाडीच्या तिघांचे अर्ज नामंजूर केल्याने या आघाडीस धक्का बसला आहे. याविरोधात या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता यावर पुढील सुनावणी होईल. एन. हरिदास आणि निवेदिता यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत न्यायमूर्ती एन. नागेश यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला उद्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी छाननीनंतर या दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले होते.कन्नूर जिल्ह्यातील थॅलेसेरी मतदारसंघात, त्रिशूरमधील गुरुवायूरमध्ये आणि इडुक्की जिल्ह्यातील देवीकुलम या मतदारसंघात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी नामंजूर केले.
थॅलेसेरीमध्ये भाजपने कन्नूरचे जिल्हाध्यक्ष एन. हरिदास यांना उमेदवारी दिली होती. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने या मतदारसंघात २२,१२५ मते मिळविली होती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची स्वाक्षरी नसल्याचे सांगून हरिदास यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. गुरुवायूरमध्येही एनडीए उमेदवाराचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. येथील उमेदवार, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष निवेदिता यांनी उमेदवारी अर्जात प्रदेशाध्यक्षपदाचे नाव नमूद न केल्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली.
माकपने काय केला आहे आरोप?
देविकुलममध्ये एआयएडीएमकेचे उमेदवार, केरळमधील एनडीएचे सहयोगी सहकारी धनलक्ष्मी यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. २६ क्रमांकाचा फॉर्म भरला नाही म्हणून अर्ज नामंजूर करण्यात आला.भाजपचे कन्नूरचे जिल्हाध्यक्ष, थॅलेसेरी मतदारसंघातील उमेदवार एन. हरिदास आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, त्रिशूरमधील गुरुवायूरच्या उमेदवार निवेदिता सुब्रह्मण्यम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांची उमेदवारी नामंजूर करणे हा भाजप आणि कॉंग्रेसमधील छुप्या कराराचा भाग असल्याचा आरोप माकपने केला आहे. दुसरीकडे, केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माकप आणि भाजपमधील हातमिळवणी समजून घेत उमेदवारी अर्ज फेटाळल्याचा आरोप केला.