Tauktae Cyclone: वेळ आली तर कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:12 PM2021-05-23T13:12:27+5:302021-05-23T13:13:07+5:30
Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळानं केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत.
Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळानं केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी गरज पडल्यास कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांची मदत करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.
रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. "कोकणात फार मोठं नुकसान झालं आहे आणि नुकसानग्रस्तांना आपण पुन्हा उभं केलं पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली नाही तरी राज्य सरकारनं पुढाकार घेऊन कोकणवासियांना भरीव मदत द्यावी. कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल पण लोकांची मदत होणं गरजेचं आहे", असं आवाहन पटोले यांनी यावेळी केलं.
तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या कोकणच्या रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यावर असता आज रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी जाऊन मच्छीमारांची व विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व समस्या ऐकून घेतली. pic.twitter.com/DklWZf5FUN
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 23, 2021
नाना पटोले यांनी यावेळी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. भाजपनं गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. खरंतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडीअडचणीत लोकांना मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्राकडून मदत मिळालीच पाहिजे हा राज्याचा संवैधानिक अधिकार आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत राज्याचा तब्बल ४० टक्के हिस्सा जातो हे लक्षात ठेवा, असं पटोले म्हणाले.