सिंधुदुर्ग - रविवारी आलेल्या तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Tauktae Cyclone) या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणच्या दौऱ्यावर आले होते. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसांपासून कोकणच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या धावत्या दौऱ्यावर कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी खरमरीत टीका केली आहे. ( "This is called Lipstick Tour, Konkan will do everything, remember Shiv Sena", Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray)
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा आज थोडक्यात आटोपला. त्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली. त्यात ते म्हणतात. ‘’यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, मुख्यमंत्री आले, पण त्यांनी कुठल्याही गावाला भेट दिली नाही. मोजून दहा किलोमीटरच्या आतच विमानतळावरचा आढावा घेत हा दौरा संपला. तर देवेंद्र फडणवीस यांनी ७०० किमीचा झंझावाती दौरा केला. आता कोकण सर्वांचा हिशोब करेल. हे शिवसेनेने लक्षात ठेवावे, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होऊ द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे दिले होते. तर सागरी किनारपट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत घ्यावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी कोकण दौऱ्यात सांगितले. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील आणि सिंधुदुर्गातील काही भागात जाऊन पाहणी केली.