देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळविण्याचा संघाचा डाव - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:39 AM2019-01-26T05:39:22+5:302019-01-26T05:39:40+5:30
भाजपाचा जनक असलेला रा. स्व. संघ देशातील सर्व संस्था, यंत्रणांवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे शुक्रवारी केला.
भुवनेश्वर : भाजपाचा जनक असलेला रा. स्व. संघ देशातील सर्व संस्था, यंत्रणांवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे शुक्रवारी केला. मोदी सरकारमध्येही संघाचा वरचष्मा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, शिक्षण, न्यायव्यवस्था यासह प्रत्येक यंत्रणेत संघाने शिरकाव केला आहे. त्यामुळे देशात अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे.
१.२ अब्ज जनतेच्या सांघिक प्रयत्नांतून देशाचा कारभार चालवला गेला पाहिजे. एकाच विचारसरणीच्या लोकांच्या हाती सत्तासूत्रे एकवटणे धोकादायक आहे. महत्त्वाच्या यंत्रणांनी कसा कारभार करावा याबाबत भाजपापेक्षा काँग्रेसची मते खूप वेगळी आहेत. आमचा विकेंद्रीकरणावर, यंत्रणांचे स्वातंत्र्य व राज्यघटनेचे पावित्र्य जपण्यावर विश्वास आहे.
राहुल गांधी म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष व सुरू असलेली निदर्शने यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. भाजपा राजकीय स्वार्थासाठी या राज्यांमध्ये धर्म, वंशाच्या आधारावर ध्रुवीकरण घडवू पाहत आहे.
>मुले मोठी झाल्यानंतर प्रियंका राजकारणात
राहुल गांधी यांनी सांगितले की, प्रियंका यांचा सक्रिय राजकारणात अचानक प्रवेश झालेला नाही. स्वत:ची मुले मोठी झाल्यानंतर मगच राजकारणात यायचे, असा निर्णय प्रियंका यांनी खूप आधीच घेतला होता.