मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेला पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आम्ही कुठेही नाराज नाही. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. पक्षाचा निर्णय पटलेला आहे अशा शब्दात पंकजा मुंडे(Pankaja Mude) यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. त्याचसोबत टीम नरेंद्र, टीम देवेंद्र हे भाजपाला मान्य नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजपा मला संपवत आहे असं मला वाटत नाही. मी छोटीशी कार्यकर्ता आहे त्यासाठी पंतप्रधानापर्यंत मला संपवण्याचा प्रयत्न कसा होईल? असा प्रश्न त्यांनी केला.
टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपाला मान्य नाही
टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष त्यानंतर मी असं धोरण आहे. ‘मी’पणा भाजपात नाही. आम्ही, आपण ही संस्कृती भाजपात आहे. भाजपाच्या संस्कृतीला मानणारी मी पक्षाची सामान्य कार्यकर्ता आहे. वेळोवेळी मी हे सांगितले आहे. पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला दिली आहे. राज्यात मुंडे-महाजन नेतृत्व करत होते तेव्हा तळागळातील लोकांना एकत्र आणून मुंडे साहेबांनी लोकांना संधी दिली आहे असं पंकजा मुंडेंनी सांगितले.
नेता हा नेताच असतो
गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र करण्याचं काम केले आहे. मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मान्य नाही. मी राज्याची महिला नेता, चांगली वक्ता आहे. नेता हा नेताच असतो. तो कोणत्याही जातीचा समाजाचा असत नाही. वंजारी समाजातील व्यक्ती मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठिशी आहे आणि राहणार आहे. पक्षाने भागवत कराड यांना संधी दिली आहे. त्यांचा पक्ष संघटनेसाठी फायदा होईल. भविष्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी त्यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात हे दिसून येईल. पक्ष वाढवण्यासाठी नेते निर्णय घेत असतात. पक्ष मजबूत व्हावा यासाठी निर्णय घेतले जातात. पक्षाच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नव्या लोकांना संधी दिली जात आहे असं पंकजा म्हणाल्या.