नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराचा देशात वाढता प्रभाव मान्य करून काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्षांची गरज सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्यानंतर आता राहुल ब्रिगेड विरूद्ध सर्व असा नवा वाद रंगला आहे. सोमवारी सकाळी होणाऱ्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव, राजस्थान-मध्य प्रदेश काँग्रेस संघटनेतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्या्ंचा संयम सुटला.
माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांनी पक्षाच्या भवितव्यावर पत्रातून चिंता व्यक्त केली. त्यामुळे आता राहुल गांधी समर्थक विरूद्ध इतर असे दोन गट पक्षात तयार झाले आहेत. महाराष्ट्रात दोनदा राज्यसभा सदस्यत्वासाठी प्रदेश काँग्रेस व ज्येष्ठ नेत्यांची इच्छा न जुमानता राहुल गांधी यांनीच उमेदवार निश्चित केला. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या राजीव सातव यांनी अलीकडे राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतली. अनेक राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांचा निर्णय अमान्य करून राहुल गांधी यांनीच निर्णय घेतल्याची काँग्रेसमध्ये चर्चा आहे. गतवर्षी तत्कालिन राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनाच पुन्हा संधी देण्यावर सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले होते. मात्र ऐनवेळी राहुल गांधी यांनी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांचे नाव निश्चित केले. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांना राज्यसभा सदस्यत्वाची आशा होती, मात्र राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर विश्वास दाखवला. पत्रात पूर्णवेळ अध्यक्ष या मुद्यावरच भर आहे.. गांधी-नेहरू कुटुंबाविषयी आदर व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या वर्षभरानंतरही पक्षाने आत्मपरिक्षण केले नाही, असेही पत्रात म्हटले आहे.राहुल गांधींच्या बाजूने बहुतांश नेते ?काँग्रेस कार्यसमितीची बैठक आज होत असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाजूने बहुतांश नेते असल्याचे दिसत आहे. रविवारी दिवसभर राहुल गांधी समर्थक आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाºया नेत्यांची बैठक होत होती. सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनविण्याची मागणी पुन्हा जोर धरेल.