पाटणाकोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकार सुरक्षेच्या नियमांच्याबाबतीत जास्त कठोर झालं आहे. याची प्रचिती शुक्रवारी बिहारच्या विधानसभेत पाहायला मिळाली. बिहार विधानसभेचं विशेष अधिवेशन शुक्रवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. पाच दिवस चाललेल्या या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सदनात अनेक परंपरा खंडीत झाल्याचं पहायला मिळालं तर आरोप-प्रत्यारोपांनीही अधिवेशन गाजलं.
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याकडून सदनातील सदस्यांना मास्कचा वापर करण्याची सूचना वारंवार केली जात होती. यात विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांना विधानसभा अध्यक्षांनी थेट मास्क दाखविण्याची सूचना केली. तेजस्वी यादव यांनी यावेळी आपल्या खिशातून मास्क बाहेर काढून विधानसभा अध्यक्षांना दाखवला. 'तुम्ही मास्क परिधान करुन बोलावं अशी सदनाची इच्छा आहे', असं विधानसभा अध्यक्षांनी तेजस्वी यादव यांना सूचित केलं. त्यावर तेजस्वी यादव संतापले.
''अजब स्थिती आहे. सभागृहात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं तर पालन केल जात आहेच. त्यासोबत १२ फुटांचं अंतर राखलं गेलंय ना? मग मास्कची आवश्यकता काय?'' असा सवाल उपस्थित करत तेजस्वी यादव यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
तेजस्वी यादव यांच्याजवळ राजदचे नेते ललित यादव बसले होते आणि त्यांनीही मास्क लावला नव्हता. ते पाहून विधानसभा अध्यक्षांनी क्षणाचाही विलंब न करता तेजस्वी यादव यांना उत्तर दिलं. ''तुम्हाला धोका ललित यादव यांच्याकडूनच आहे'', असं विधानसभा अध्यक्ष तेजस्वी यादव यांना म्हणाले.
मास्कचा वापर करण्याची वारंवार विनंतीसभागृहात विधानसभा अध्यक्षांना सदस्यांना मास्क वापरण्याची वारंवार विनंती करावी लागत होती. काही सदस्य मास्कविना बसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढच्या वेळेपासून मास्क घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. सभागृहात असताना मास्क वापरणं बंधनकारक असून केवळ भाषणादरम्यान मास्क काढता येईल, अशा कडक सूचना यावेळी अध्यक्षांना द्याव्या लागल्या. यासोबत जे सदस्य मास्कशिवाय आलेत त्यांना मास्क उपलब्ध करुन दिले जावेत, असंही त्यांनी सांगितलं.