हैदराबाद - बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपाने दक्षिणेतील राज्यांकडे आपलं लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. तेलंगणात सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation polls) प्रचार सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (AIMIM leader Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
"असदुद्दीन ओवैसी हे मोहम्मद अली जिना यांचे अवतार आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. तेजस्वी सूर्या यांनी ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. ओवैसींना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं असा घणाघात देखील केला आहे. "ही फक्त एक महानगरपालिका निवडणूक नाही, जर तुम्ही ओवैसी यांना मतं दिली तर ते महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेशांत मजबूत होतात" असं म्हटलं आहे. हैदराबादमध्ये प्रचार करताना तेजस्वी सूर्या यांनी असं म्हटलं आहे.
"हैदराबादला इस्तंबूल बनवण्याचा प्रयत्न सुरू", तेजस्वी सूर्या यांचा हल्लाबोल
तेजस्वी सूर्या यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावरही निशाणा साधला आहे. हैदराबादला इस्तंबूल बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. "तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष अनेकदा भारताविरोधात बोलतात आणि चंद्रशेखर राव यांना हैदराबादला तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल बनवायचं आहे. त्याचमुळे त्यांनी एआयएमआयएम सोबत आघाडी केली. त्यांना पाकिस्तानसारखा हैदराबाद हवा" असं तेजस्वी सूर्या यांनी म्हटलं आहे.
हैदराबादमध्ये एक डिसेंबर रोजी मतदान
"बंगालमध्येही युवा मोर्चा कोणालाही न घाबरता जनतेची भेट घेत राहील. तेलंगणात भाजपाला मिळालेलं यश तामिळनाडू, केरळ यांसारख्या राज्यांत पक्षासाठी महत्त्वाचं आणि उपयोगी ठरेल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हैदराबादमध्ये एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे त्याआधी सर्व पक्षांचे स्टार प्रचारक प्रचारासाठी येथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.