जळगाव : भाजपचे आमदार तथा व्यापारी असलेल्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे. लाड यांच्यासारख्या व्यापाऱ्याने अशी भाषा करणे योग्य नाही. मात्र, जर त्यांनी तसा इशाराच दिला असेल तर लाड यांनी आम्हाला तशी तारीख कळवावी, त्यांनी सेना भवन फोडण्याची हिंमत करून दाखवावी, आम्ही त्यांचे काय-काय फोडू हे त्यांना लक्षात आणून देऊ, असे थेट आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लाड यांना दिले आहे. पाटील म्हणाले, राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले, परंतु तसे होत नसल्याने आता काहीही करून वातावरण तापवण्याचा हा प्रकार आता भाजपकडून सुरू आहे. मागेही काही कारण नसताना भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेना भवनावर चालून आले होते.गिरीश महाजनांनी जामनेरकडे पाहावे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कोकणातील पूरग्रस्तांच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, ही वेळ राजकारण करण्याची नसून, पूरग्रस्तांची मदत करण्याची वेळ आहे. महाजन जामनेरमधून थेट कोकणात मदतीला जात आहे. त्यांचे अभिनंदन. मात्र, जामनेरमध्ये काय सुरू आहे? याकडेदेखील महाजनांनी लक्ष दिले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.
माझ्यासाठी विषय संपला - प्रसाद लाडमुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो. शिवसेना भवनाबद्दल बोलणे हे चुकीचेच झाले. पण, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. त्यामुळे कालच मी यासंदर्भात व्हिडीओद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.