शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लावायची यावरून महाविकास आघाडीत अजून एकमत झालेले नाही. पटाेले यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बाेलले जात आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून महाआघाडीमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटाेले यांच्या नावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा ध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी नाना पटाेले यांनी बुधवारी राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्यासाेबत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर पटाेले यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेराम यांच्याकडे मंत्रीपदाची दुहेरी जबाबदारी देण्यात आली हाेती. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. संभाव्य प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत नाना पटाेले यांचे नाव आघाडीवर हाेते, तसेच पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगाेपाल यांनीही पटाेले यांच्या नावाला पसंती दिली हाेती.
विधानसभा अध्यक्ष काेण?पटाेले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद काेणाला मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. हे पद काँग्रेसकडे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर दावा करण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर हा गुंता वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेस मात्र सरकार स्थापनेसाठी सर्वानुमते सहमती मिळालेल्या फाॅर्म्युल्यावर ठाम आहे.
'या' शक्यतांचीही सुरू आहे चर्चा नाना पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणारआदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार व ते पद बाळासाहेब थोरात यांना देणार अशीही चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीही दावा करणार
मुख्यमंत्री नाराज?नाना पटाेले यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बाेलले जात आहे. अहमद पटेल हयात असताना पूर्वचर्चेविना असा निर्णय कधीही घेण्यात आला नसल्याचे बाेलून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुूत्रांनी दिली. पटाेले यांचा राजीनामा देण्यापूर्वी बाळासाहेब थाेरात, अशाेक चव्हाण आणि सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी हा घटनाक्रम घडला. उद्धव ठाकरे यांनी के.सी. वेणुगाेपाल यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीवरून मुख्यमंत्र्यांनी शंका उपस्थित केली.