मुंबई - बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या भाजपाच्या (BJP) नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपावर चौफेर हल्लाबोल केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहामधून हिंदुत्व आणि बाबरी मशिदीबाबत (Babri Masjid) बोलणे शिवसेनेच्या महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांना फारसे रुचलेले नाही. मुख्यमंत्री आता केवळ पक्षप्रमुख राहिलेले नाहीत. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बाबरी मशिदीबाबत केलेले विधान अयोग्य होते, अशी टीका महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. (The Thackeray government did not remain secular, Abu Azami Criticize Uddhav Thackeray for His Statement on Babri Masjid)अबू आझमी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये बाबरी मशिदीवरून केलेले विधान अयोग्य होते. महाविकास आघाडीमधील मुस्लिम नेत्यांनी या विधानाचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत. उद्धव ठाकरे हे आता केवळ शिवसेना पक्षप्रमुख राहिलेले नाहीत. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असे विधान करता कामा नये होते. सरकारमध्ये असलेल्या मुस्लिम नेत्यांना या विधानाची लाज वाटली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाचा निषेध म्हणून राजीनामा दिला पाहिजे. असे आवाहन अबू आझमी यांनी केले. दरम्यान, काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर घणाघाती टीका केली होती. "भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व 'येर गबाळे' पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. "ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत अमित शहांनी दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.