कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी पूर्वेतील चक्कीनाका येथील गुणगोपाळ मैदानात आयोजित केलेल्या सभेला वाहतूककोंडीत अडकल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुखउद्धव ठाकरे तब्बल पावणेतीन तास उशिराने पोहोचले. मात्र, दुपारी ४ वाजल्यापासून त्यांची वाट पाहणारे शिवसैनिक तसेच भाजप कार्यकर्ते जागेवरून हलले नाही. ठाकरे सभास्थानी येताच जयजयकाराच्या घोषणांनी सारा आसमंत दणाणून सोडला.सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारले होते. शिवसैनिकांसह भाजप कार्यकर्त्यांसाठी सुमारे चार हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व खुर्च्या भरल्या होत्या. ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी काहींनी उभे राहणे पसंत केले. सर्वांना ठाकरेंचे भाषण पाहायला आणि ऐकायला मिळावे, म्हणून व्यासपीठाच्या बाजूला दोन, तर मैदानाबाहेर एक मोठा स्क्रीन लावण्यात आला होता.युतीचे कार्यकर्ते दुपारी ४ वाजल्यापासून सभेच्या ठिकाणी बस, रिक्षा, खाजगी वाहने तसेच चालत येत होते. त्यांच्या हातात शिवसेना तसेच भाजपचे झेंडे, गळ्यात पक्षाचे पट्टे, तर काही कार्यकर्त्यांनी हातात धनुष्यबाण घेऊन मैदानात प्रवेश केला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल पावणेतीन तास उशिराने म्हणजेच, सायंकाळी पावणेआठच्या सुमारास ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे होते.ठाण्यात ‘फक्त सेना’ या टोप्यांनी वेधले लक्षठाणे : महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर उद्धव ठाकरे यांच्या मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत बरेच शिवसैनिक ‘फक्त शिवसेना’ असे लिहिलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या परिधान करून आले होते व त्याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले. व्यासपीठापासून सर्वच ठिकाणी भगवे झेंडे, पताका लावलेल्या व अनेकांनी भगवे शर्ट किंवा साड्या परिधान केल्या होत्या.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. संजय केळकर, शहरप्रमुख संदीप लेले आदी उपस्थित होते. प्रारंभी विचारे यांना भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर या गर्दीत फक्त शिवसेना या टोप्या लक्ष वेधून घेणाºया होत्या. सभास्थानी भाजप, शिवसेना व रिपाइंचे झेंडे लावले होते. व्यासपीठाच्या वरील दोन्ही बाजूंना मोठे स्क्रीन लावले होते. त्यामुळे दूरवरील श्रोत्यांनाही सभा पाहणे सोयीचे झाले होते. ठाकरे यांच्या या सभेची वेळ सव्वासहा वाजताची होती. शिवसैनिक ५ वाजल्यापासून हजर होते, पोलीस सकाळी ८ वाजल्यापासून सुरक्षेकरिता तैनात होते.