"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 02:31 PM2024-10-08T14:31:40+5:302024-10-08T14:34:48+5:30
अरविंद केजरीवाल हरयाणा विधानसभा निवडणूक निकाल २०२४: भाजपाने हरयाणात जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. तर जम्मू काश्मिरमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या निकालांवर अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे.
Arvind Kejriwal on Haryana elections Result 2024: सगळ्यांचे अंदाज चुकवत भाजपाने सलग तिसऱ्यांदा हरयाणातील सत्तेला गवसणी घातली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर पडलेल्या भाजपाने नंतर मुसंडी घेत काँग्रेसला मागे लोटले. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा विरोधी बाकांवर बसावं लागणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. या निकालाबद्दल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणूक निकालावर केजरीवाल काय बोलले?
दिल्लीत पक्षाच्या मेळाव्यात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "जितकं देवाने दिलं आहे, आनंदी रहा. देशाची सेवा करा. आता निवडणूक येत आहे. पहिली गोष्ट अशी की, कोणतीही निवडणूक हलक्यात घेतली नाही पाहिजे. आता माहिती नाही की, निकाल काय येतील; पण आजच्या निवडणुकीतून सर्वात मोठा धडा हाच आहे की, कधीच अतिआत्मविश्वास बाळगू नका."
"कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायचं नाही. प्रत्येक निवडणूक कठीण असते. प्रत्येक जागा कठीण असते. कष्ट घ्यायचे आहेत आणि आपसात वाद घालू नका. सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे. कारण आपण एमसीडीमध्ये आहोत. बाकी गोष्टी जनता माफ करेल, आवश्यक गोष्टींची अपेक्षा असते", असे केजरीवाल कार्यकर्त्यांना म्हणाले.
"मार्च-एप्रिलमध्ये भांडण करू, आता निवडणुकीवर लक्ष द्या"
"आपापल्या परिसरात दररोज फिरा आणि कचरा उचलला जाईल आणि दररोज सफाई होईल यासाठी प्रयत्न करा. तितके काम तुम्ही केले, तर मला आशा आहे की आपण निवडणूक जिंकू. भांडण करू नका. भांडण एप्रिलमध्ये करू. आपले कुटुंब आहे, भांडण होतातच. त्यात काहीही चुकीचं नाही. पण, आपण भांडण आपण मार्च एप्रिलमध्ये करू. फेब्रुवारीमध्ये निवडणूक आहे, ती जिंकणं आपलं लक्ष्य आहे", असे अरविंद केजरीवाल दिल्लीत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले.