15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 00:40 IST2024-10-18T00:38:40+5:302024-10-18T00:40:40+5:30
Maharashtra Congress News: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. या यादीत १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
Maharashtra Breaking News in Marathi: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसच्या १५ उमेदवारांची नावे असलेली एक यादी व्हायरल झाली आहे. काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरी असलेली ही यादी व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडून खुलासा करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे जागावाटप अजूनही रखडले आहे. २५ जागांवरून पेच निर्माण झालेला असून, दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर सोशल मीडियावर काँग्रेस उमेदवारांच्या नावाची एक यादी व्हायरल झाली.
या यादीत मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे आहेत. यात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांच्यासह वेगवेगळ्या १५ मतदारसंघातील नावांचा समावेश आहे. ही यादी व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
"भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अजून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची कोणतीही यादी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.लवकरच योग्य त्या माध्यमांद्वारे आम्ही ती यादी जाहीर करू", असे या यादीबद्दल काँग्रेसने म्हटले आहे.