Mahayuti Seat Sharing Latest Update: महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीचेही काही मतदारसंघांमुळे जागावाटप रखडले आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीला सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. या बैठकीत किती जागांचा तिढा सुटला, उमेदवार जाहीर करण्याबद्दल तिन्ही पक्षांचे काय ठरले आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
महायुतीचे जागावाटप, देवेंद्र फडणवीसांनी काय दिली माहिती?
दिल्लीवरून देवेंद्र फडणवीस नागपूरला परतले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जागावाटपासंदर्भातील आमची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे. कालही (१८ ऑक्टोबर) भरपूर सरकारात्मक चर्चा होऊन जवळपास ज्या अडचणीच्या जागा होत्या. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त जागा सोडवल्या आहेत, थोड्याशा जागा शिल्लक आहेत."
"दोन दिवसात आम्ही त्या सोडवू. आमचं असं ठरलेलं आहे की, क्लिअर झालेल्या ज्या जागा आहेत, त्या त्या-त्या पक्षाने आपापल्या सोयीने त्याची घोषणा (उमेदवार जाहीर करणे) करावी. भाजपाची पद्धत आहे की, निवडणूक समिती, संसदीय मंडळ अशा आमच्या सगळ्या प्रक्रिया असतात. त्या जवळपास संपत आल्या आहेत. आमची पहिली यादी कधीही येऊ शकते. म्हणजे लवकर येऊ शकते अशी परिस्थिती आहे. जागावाटप लवकरच सांगू", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महायुतीत किती जागांचा पेच?
अमित शाह यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबद्दल माहिती दिली. "महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होती. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एक-दोन दिवसात सर्व जागावाटपाबाबत निर्णय होईल. तिढा एवढा जास्त राहिलेला नाही. आता ३०-३५ जागांचा तिढा आहे", अशी माहिती शिंदेंनी दिली.