कोलकाता : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावरील झालेल्या हल्ल्याने पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तणावाचे झाले आहे. भाजपा-टीएमसी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता टीएमसीच्या नेत्याने भाजपावर गंभीर आरोप केला आहे. जर येती विधानसभा निवडणूक भाजपा जिंकली नाही तर गुप्तपणे लोकांना पाठवून ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकते, असा आरोप मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी केला आहे.
राज्यात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये ते बोलत होते. (West Bengal Assembly Election) सुब्रत मुखर्जी हे ममता यांच्या सरकारमध्ये पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पश्चिम बंगालचे नेते कैलास विजयवर्गिय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले होते. या हल्ल्यातून नड्डा यांची कार बुलेटप्रूफ असल्याने वाचली होती. मात्र, विजयवर्गीय यांच्या कारचा काचा फोडून हे दगड आतमध्ये घुसले होते. विजयवर्गीय यांनी हे दगड हातांनी थोपवत स्वत:ला वाचविले होते. यामध्ये त्यांना दुखापत झाली होती. गुरुवारी नड्डा हे ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. यावेळी हा हल्ला करण्यात आला होता. दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.
भाजपा कार्यकर्त्याचा हल्ल्यात मृत्यूपश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. उत्तर 24 परगना येथील हलिशहरमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा करत हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीररित्या जखमी झाल्याचे भाजपाने म्हटले आहे. भाजपाने यासंदर्भात ट्विट केले आहे. "आणखी एक दिवस, आणखी एक हत्या. हलिशहरमध्ये कार्यकर्ता सैकत भवाल यांची टीएमसीच्या गुंडांनी निर्घृण हत्या केली, तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना कल्याणीच्या जेएन मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्टीचे डोर टू डोर कॅम्पेन करत असताना सैकत भवाल यांच्यावर हल्ला झाला," असे ट्विट करण्यात आले आहे.