Maha Vikas Aghadi Maharashtra seat Sharing: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. पण, महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून पेच निर्माण झाला आहे. विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने दावा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे विदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला जागा हव्या असून, त्याला काँग्रेसने नकार दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपाचा नेमका वाद काय?
मविआतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने १२ जागांवर दावा केला आहे. अबू आझमी यांनी हा दावा केला असून, त्यांना कोणत्या मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यावरून इशारे आणि लक्ष्य केले जात असल्याचे दिसत आहे.
त्यातच खासदार संजय राऊतांनी नाना पटोले यांचे नाव न घेता जागावाटपाबद्दल दिल्लीत चर्चा केली जाईल, असे विधान केले. त्यावर नाना पटोलेही बोलले आणि महाविकास आघाडीत काही जागांवरून तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.
२८ जागांवरून वाद कसा निर्माण झाला?
महाविकास आघाडीमध्ये २५० पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर २८ जागांवरून पेच निर्माण झाला आहे. या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे.
मुंबईतील तीन जागांचा तिढा आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.
मुंबईतीलच भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते.
ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत विदर्भातील रामटेक, अमरावतीसह काही जागा काँग्रेससाठी सोडल्या. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विदर्भातील काही जागांवर दावा केला जात आहे. त्या जागा सोडण्यास काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नसल्याने आता हा मुद्दा दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची शक्यता आहे.