श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संगमनेर येथील दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांसह जिल्हाध्यक्षांनी पदे सोडली. जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीही बरखास्त करण्याची नामुष्की आली. आता या पक्षाची आमची कुठेही शाखा नाही, अशी परिस्थिती झाली आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.शुक्रवारी श्रीरामपूरच्या थत्ते मैैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांचे भाषण व काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काल्पनिक कथा व मनोरंजन बनले आहे. त्याचा वास्तवतेशी काहीही संंबंध नसतो. त्यामुळे मतदारांनी ते फार मनावर घेऊ नये. ते देशाच्या जवानांच्या कामगिरीवर शंका घेतात. बालाकोटमधील हवाई हल्ल्याची जगाला खात्री पटलेली असताना राहुल गांधी व पाकिस्तान हे दोघेच प्रश्न उपस्थित करतात. देशद्रोहासारखा कायदा हटविण्याची भाषा ते करीत आहेत. संविधान व तिरंग्याच्या अपमानासह, तसेच नक्षलवादी व माओवादी वृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करणारा कायदा मागे घेण्याची घोषणा करून काँग्रेस सुरक्षेच्या प्रश्नाशी खेळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने जनधन खाती उघडली. त्यात ८० हजार कोटी रूपये जमा केले. शौचालये, घरकुले, गॅस अनुदानाचे पैैसे त्यात थेट जमा केले जातात. त्यामुळे सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार थोपविण्यात यश आले आहे. काँग्रेस सरकार केवळ गरिबी हटावच्या घोषणा करते. गरिबांना ७२ हजार रुपये देऊ असे सांगते. मात्र राहुल यांचे आजोबा, आजी, वडील, आई यांना सत्ता देऊनही गरिबी दूर झाली नाही.‘विखेंना भाजपत घेऊ’डॉ. सुजय विखे म्हणाले, काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे व अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे हे दोघेही आमचेच उमेदवार आहेत. त्यांची किती ताकद आहे व ते किती पाण्यात आहे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. आपल्या वडिलांना लवकरच पक्षात घेऊ. डॉ. विखे यांच्या या वक्तव्यामुळे राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करणार, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी दुपारी बारा वाजता लोणीत राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
कुठेही शाखा नाही, अशी काँग्रेसची स्थिती-फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 5:19 AM