बारामती : सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेमध्ये केलेले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्याने निमाण करण्यात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. याबाबत येणाऱ्या बातम्यांनादेखील फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही. मल्टिस्टेट बँका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्राचे सहकार मंत्रालय हा नवीन विषय नाही. मागील दहा वर्षे आपण कृषी खाते सांभाळत असतानाही हा विषय होता आणि आताही आहे.
एकविचाराने राज्यकारभारआम्ही पक्ष एकत्र चालवत नाही तर सरकार एकत्र चालवत आहोत. त्यामुळे एका विचाराने सरकार चालवण्यावर आम्ही ठाम आहोत. त्यात कोणताही वाद नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या संघटनेची व्याप्ती वाढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेस तसेच शिवसेना या पक्षांनी याबाबत भूमिका घेतली तरी त्यात वावगे काही नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं का हीही नाही. सरकार एकविचाराने आहे की नाही हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाना पटोले लहान माणूस, त्यांच्याबद्दल बोलणार नाही
- नाना पटोले यांनी काही वक्तव्य केले असेल तर त्यासंदर्भात मला काही बोलायचे नाही. ती लहान माणसे आहेत. सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना आपण जास्त महत्व देत नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.
- दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेले का खुपते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला होता.
- पुण्याचे पालकमंत्री आपले काम करत नाहीत. शत्रूला त्याच्या घरात जाऊन मारू, अशी पुस्तीही पटोले यांनी जोडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावर माध्यमांनी पवार यांना छेडले असता त्यांनी पटोले यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देत नसल्याचे सांगितले.
विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेचआमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत. समान नागरी कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. सरकार काय करते यावर आमचे लक्ष आहे.