नांदेड: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. आता राज्यपालांनी या मुद्द्यावरुन सरकारला प्रत्युत्तर दिलंय. 'मी संविधानानं दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय. कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असं राज्यपाल म्हणाले.
आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांकडून राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.
राज्यपालांचे प्रत्युत्तरनांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यात बैठका नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती राज्यपालांनी दिली. तसेच, मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार, असं राज्यपालां म्हटलं.