अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेतला जाणार असून मुंबई काँग्रेसमध्येही येत्या एकदोन महिन्यांत मोठे फेरबदल दिसतील, अशी माहिती काँग्रेसचे नवे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा ऊर्फ एच.के. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा दौरा करू, असे सांगून पाटील म्हणाले, मी राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा खास आहे, असे बोलले जाते. राज्यात काँग्रेससाठी काम करणारे सगळेच नेते माझ्यासाठी खास आहेत. महाराष्ट्रात कुठलीही गटबाजी आपण चालवू देणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला, त्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, पटेल हे मोठे नेते आहेत. ते आमच्या नेत्यांशी थेट बोलू शकतात. त्यांना कोणते मुद्दे अडचणीचे वाटले, मला माहीत नाही. मात्र, बिहार असो की अन्य कुठलेही राज्य, चांगल्या प्रस्तावांचे काँग्रेस नेहमीच स्वागत करेल.
वाचा संपूर्ण मुलाखत - "दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचे नाव घेणे हाच मुळात विरोधाभास"; काँग्रेस प्रभारींची पंतप्रधानांवर टीका
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राविषयी काँग्रेसची भूमिका काय आहे? असे विचारले असता पाटील म्हणाले, संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने सेक्युलर शब्दावरून जी टिप्पणी केली, ती त्यांना शोभा देत नाही. त्यांनी घटनेने दिलेल्या औचित्याचा भंग केला आहे. घटनेने धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या दिलेल्या विश्वासार्हतेला राज्यपालांच्या पत्रामुळे धक्का बसला आहे. मुख्यमंत्रीच नाही तर देशातल्या सामान्य माणसानेही धर्मनिरपेक्ष असलेच पाहिजे. त्यामुळे त्यावर अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने असे विधान करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आजपर्यंत अन्य कोणत्या राज्यपालांनी अशा पद्धतीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते का? असे विचारले असता पाटील म्हणाले, मला यावर अधिक काही बोलायचे नाही.मुंबईत मोठे फेरबदलमुंबई काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल केले जाणार असून या शहरांतही पक्ष मजबूत झालेला दिसेल. मिलिंद देवरा यांच्यासह सर्वांना विश्वासात घेऊन फेरबदल केले जातील, असे पाटील यांनी सांगितले.