"याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 08:36 PM2024-10-22T20:36:45+5:302024-10-22T20:39:34+5:30
Supriya Sule Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात असून, बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी नामोल्लेख न करता अजित पवारांना लक्ष्य केलं.
Ajit Pawar Baramati: "कुणीतरी लढले पाहिजे. सगळेच हाजी हाजी करायला लागले, तर देश कसा चालणार? आज आमच्या घरात घुसले, उद्या तुमच्या घरात घुसतील. ही लढाई तत्त्वांची आहे. जो अन्याय आमच्यावर केला. जो अन्याय पवार साहेबांवर, उद्धव साहेबांवर केला. हा दुसऱ्यांवर करता कामा नये. जर आम्ही ऐकून घेतलं, तर यांना वाटेल पाहिजे ते आम्ही करू शकतो. हे या देशात चालणार नाही", असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी वक्फ बोर्ड मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. त्याचबरोबर तुमची भूमिका काय, असे म्हणत अजित पवारांचीही कोंडी केली.
बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंनी वक्फ बोर्ड संशोधन बिलाच्या मुद्द्यावरून घेरलं.
"हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानी चालणार नाही. हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणार. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळ्या यंत्रणा चालवू शकता? कधी न कधी वेळ येईल, जेव्हा हा देश कुणाच्या मनमानी नाही, तर संविधानानेच चालेल. कष्टायची परिकाष्ठा करू, पण हा अन्याय बंद करू", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजप सरकारला लक्ष्य केले.
"समाजाचं ऐकल्याशिवाय वक्फ बोर्डमध्ये बदल करू देणार नाही"
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "वक्फ बोर्डचं. वक्फ बोर्डसाठी पण... जे काही त्यांचं मत असेल. पूर्ण ताकदीने तुम्ही मला आशीर्वाद दिला. तिथे गेल्यानंतर ते म्हणायला लागले वक्फ बोर्डचं असं करू, तसं करू. मी म्हटलं नाही चालणार. वक्फ बोर्डबद्दल ज्या समाजाचा प्रश्न आहे, त्या समाजाचं ऐकल्याशिवाय आम्ही तुम्हाला वक्फ बोर्डमध्ये बदल करू देणार नाही. तुम्ही त्या समाजाला विचारा. मानसन्मान करा ना", असे सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला उद्देशून म्हटलं.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बाजूने आहात की, विरोधात"
"बदल करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता बारामतीत बदल करायचा, तर बारामतीकरांना विचार की, बदल करायचा की नाही करायचा? लोकशाही आहे, मनमानी नाही चालणार. मला तर काय ट्रोल केलं. काय बोलायचं ते बोला, मला फरक पडत नाही. कारण माझं मन साफ होतं. वक्फ बोर्डच्या वेळी जेव्हा मतदान झालं, तेव्हा या राज्यातील किती पक्षांनी मतदान केलं? याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. ज्यांना सोयीचं होतं, ते तिथून गायब झाले. असं नाही चालणार... हो किंवा नाही", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची नाव न घेता कोंडी केली.
"लोकसभेत निवडणूक गेलात ना, मग पळपुटेपणा नाही चालणार. तुम्ही सोबत आहात की विरोधात, हे तुम्हाला बोलावं लागेल. का त्यांनी मतदान केलं नाही? त्या पक्षाने उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही सत्तेमध्ये आहात ना? मग सांगा तुमच्या खासदाराने वक्फ बोर्डच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे? तुम्ही वक्फ बोर्डच्या बाजूने की विरोधात? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. कारण की, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलंच नाही आजपर्यंत", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना नाव न घेता लक्ष्य केले.