पालघर : पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे झालेल्या जाहीर सभेत दिली. वसईतील गुंडगिरी, २९ गावे वगळणे, वाढवण बंदर आदी जुन्या मुद्द्यांना आपल्या भाषणातून हात घालणाºया ठाकरे यांनी जिल्ह्याला भेडसावणाºया प्रश्नांबाबत बोलायचे टाळले.
पालघर येथील दांडेकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयी संकल्प रॅली, प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पालघरच्या शनिवारच्या ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या रखरखत्या उन्हात हजारो कार्यकर्ते तासभर बसून असल्याचे पाहून ही सभा जिद्दीने, विचाराने पेटलेली असल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी केला. हा भाग मला आता नवीन नसून येथील आदिवासी पाडे व शहरी भागात मी पोटनिवडणुकीच्या वेळीही प्रचार केला होता, असे त्यांनी सांगितले. बविआ हा पक्ष नसून एक कंपनी आहे, असा उल्लेख करीत मतदारसंघातील त्यांची गुंडगिरी मोडीत काढणार, अशी टीका त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचा नामोल्लेख टाळत केली.
निसर्ग संपन्न वसईच्या जमिनी हडपण्याचा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा डाव असून हितेंद्र ठाकूर म्हणजे वसईला लागलेली कीड असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला. तसेच आमचा बालेकिल्ला असलेल्या तीनही विधानसभेतील युतीच्या कार्यकर्त्यांनी ही कीड वाढू दिली नसल्याबद्दल अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाला उखडून टाकण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
वाघोली (वसई) मधील ग्रामस्थांनी मारहाण करीत गुंडगिरी मोडून काढल्याचा २००९ सालच्या प्रकरणाचा उल्लेख करीत तुमच्या पाठीमागे मी व मुख्यमंत्री असतील, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. वसई तालुक्यातील २९ गावे महानगरपालिकेतून वगळण्याबाबत दिलेला शब्द मागे घेणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी गुंडगिरीविरोधात उभारलेल्या लढ्याचे त्यांनी कौतुक केले.
येथील गुंडगिरी मोडून काढायला मी व माझे शिवसैनिक पुरेसे असल्याचे सांगून मुंबई, ठाणे पालिकेचा कारभार व वसई-विरारचा कारभार बघा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले. तर खासदार गावितांनी उन्हात बसलेल्या कार्यकर्त्यांचे ‘सच्चे, निष्ठावान’ म्हणून कौतुक केले. विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असून हे कट्टर कार्यकर्ते त्याला भुलणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार मनीषा चौधरी यांनी विरोधकांच्या संपर्कातील युतीच्या काही लोकांची पूर्ण खबर माझ्यासह मुख्यमंत्र्यांकडे असल्याचा गौप्यस्फोट केला.